Team India Prize Money, IND vs SA: भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून टी-२० विश्वचषक २०२४चे विजेतेपद पटकावले आहे. टीम इंडियाने दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक ट्रॉफी जिंकली आहे
T20 World Cup Prize Money: भारतीय संघाने दशकभराची प्रतिक्षा संपवत अखेर टी-२० विश्वचषक ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. भारताने दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. टी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला. भारतीय संघाने एकही सामना न गमावता टी-२० विश्वचषकाचे जेतेपद आपल्या नावे केले आहे. अंतिम सामन्यातही भारतासाठी गोलंदाज आणि फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर आयसीसीने दोन्ही संघांना बक्षिसाची रक्कम किती दिली आहे जाणून घ्या.
आयसीसीने टी-२० विश्वचषक २०२४ सुरू होण्याच्या वेळी बक्षिसाची रक्कम जाहीर केली होती. यावेळी टी-२० विश्वचषकासाठी अंदाजे ९३.५ कोटी रुपये वितरित करण्याची घोषणा करण्यात आली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला टी-२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद जिंकण्यासाठी २०.३६ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली आहे. तर उपविजेता ठरलेला दक्षिण आफ्रिकेचा संघालाही मोठी रक्कम मिळाली आहे. आफ्रिकन संघाला १०.६४ कोटी रुपये मिळाले आहेत.
उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांनाही आयसीसीकडून बक्षिसांची मोठी रक्कमही मिळाली आहे. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना प्रत्येकी ६.५५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्याच वेळी, सुपर८ पर्यंत पोहोचलेल्या संघांना ३.१८ कोटी रुपये देण्यात आले आहेत. दुसरीकडे, ग्रुप स्टेजमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघांना २.०६ कोटी रुपये मिळाले आहेत. सुप८ पर्यंत प्रत्येक सामना जिंकण्यासाठी संघांना २५.९ लाख रुपये मिळाले आहेत. भारतीय संघाने सुपर८ पर्यंत सलग ६ सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेने सुपर एट पर्यंत ७ सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत सुपर८ पर्यंत प्रत्येक सामना जिंकण्यासाठी भारताला १.५५ कोटी रुपये आणि दक्षिण आफ्रिकेला १.८१ कोटी रुपये मिळाले आहेत.
टी-२० विश्वचषक २०२४ च्या बक्षिसाची रक्कम
विजेता- २०.३६ कोटी रुपये
उपविजेते – १०.६४ कोटी
उपांत्य फेरीत पराभूत – ६.५५ कोटी रुपये
सुपर८ संघ – ३.१८ कोटी रुपये
९ ते १२ क्रमांकावर असलेल्या संघांना – २.०६ कोटी रुपये
१३ ते २० क्रमांकावर असलेल्या संघांना – १.८७ कोटी रुपये
प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला बोनस – रु २६ लाख